21 कोविड कंत्राटी कर्मचार्यांची सेवा खंडीत
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर बंद
भुसावळ : कोरोनाच्या दुसर्या लाटेची गंभीर स्थिती वर्तवली जात असताना भुसावळात कोविड अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेतलेल्या विविध 21 कोविड कंत्राटी कामगारांची सेवा सोमवार, 30 नोव्हेंबरपासून खंडीत करण्यात करण्यात आली आहे. याबाबत शल्य चिकित्सक डॉ.एन.जी.चव्हाण यांनी आदेश काढल्याने 1 डिसेंबरपासून शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरही बंद करण्यात आले आहे.
21 पदांची सेवा खंडित
कोविड अंतर्गत आरोग्य सेवा देण्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात विविध पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली होती. यात भुसावळात 21 पदे भरली होती. त्यात प्रामुख्याने डॉक्टर, लॅब टेक्निशिशन, नर्सिंग स्टॉप, वॉर्ड बॉय, डाटा ऑपरेटर यांना 30 नोव्हेंबरपर्यंत कामाचे आदेश देण्यात आले होते. यामुळे त्यांची सेवा 30 नोव्हेंबर रोजी खंडित केली जाणार आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील केवळ एक्सरे टेक्निशीयन यांना पुर्नमुदत देण्यात आली आहे. संबंधीत 21 कर्मचार्यांनी 30 नोव्हेंबर रोजीचा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर 1 डिसेंबरपासून कामावर येवू नये, त्यांना मानधन दिले जाणार नाही. असे आदेशात म्हटले आहे. परीणामी आरोग्य कर्मचार्यांचा स्टॉपच नसल्याने येथील कोविड सेवाही केली जाईल. या रुग्णालयांचे सॅनीटायझेशन करून तत्काळ नॉन कोविड सेवा नियमितपणे सुरू कराव्यात, असे निर्देशही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. आगामी काळात अत्यावश्यकतेनुसार कोविड रुग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा कामावर घेवून प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये होतील उपचार
भुसावळ शहरात यापूर्वीच रेल्वे हॉस्पीटलची कोविड सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत तर दोन दिवसांपूर्वीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड सेंटरही बंद झाले आहे. आता गंभीर व ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले जाणार आहे. गरज भासल्यास बंद झालेले भुसावळातील कोविड सेंटर सुरू केले जातील.

