भुसावळात पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानात चोरी
दरवाजा तोडून सिलिंडरसह पाण्याची इलेक्ट्रीक मोटार लांबवली
भुसावळ : शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पंचायत समितीच्या सभापती मनीषा भालचंद्र पाटील यांच्या निवास्थानीच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी निवासस्थानाचा दरवाजा तोडून घरातील सिलिंडरसह इलेक्ट्रीक पाण्याची मोटार लांबवली. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे भालचंद्र पाटील म्हणाले. पंचायत समिती सभापतींना तार ऑफिस रस्त्यावर निवासस्थान देण्यात आले असून अधून-मधून त्या निवासस्थानी आरामासाठी थांबतात. 28 ते 30 दरम्यान शासकीय सुटी आल्याने सभापती गावी असल्याने निवासस्थानाला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील किचनमधील सिलिंडर तसेच पाण्याची इलेक्ट्रीक मोटार लांबवली. सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे भालचंद्र पाटील म्हणाले. बुधवारी स्वतः सभापती या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार नोंदवणार आहेत. शहर पोलिसांनी चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

