बीएचआर घोटाळ्याशी संबंध नाही : माजी मंत्री गिरीश महाजन


राजकीय षडयंत्रातून गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा केला दावा

जामनेर : जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील घोटाळ्या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यातून निश्‍चितच सत्य बाहेर येणार असून या घोटाळ्याशी आपला संबंध नाही मात्र राजकीय द्वेषापोटी षडयंत्र रचून मला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले. जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बुधवारी पत्रकार परीषद घेतली होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला होता तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे सरकार असतांना गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकांना आपले बालक काय उद्योग करताहेत याची माहिती नव्हती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी उपस्थित केला होता.

सत्ताधारी पक्षाकडून मुद्दामहून त्रास
माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून मुद्दामहून त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे मात्र अद्याप मी कुणाचेही नाव घेणार नाही मात्र योग्य वेळ आल्यावर भूमिका निश्‍चित मांडणार आहे. बीएचआर पतसंस्थेचा मी साधा शेअर होल्डर नाही शिवाय कोणतीही जमीन मी खरेदी केलेली नाही त्यामुळे पोलिस चौकशीत सर्व सत्य निश्‍चित समोर येईल, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !