विद्युत रोहित्राची समस्या न सुटल्यास वीज कंपनीला कुलूप ठोकणार
राष्ट्रवादीचे अॅड.पवनराजे पाटील यांचा वीज कंपनीला इशारा
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक रोहित्र (विद्युत डीपी) गेल्या एक ते दोन महिन्यांपासून जळाले असताना अद्यापही ते शेतकर्यांना ते बदलून न मिळाल्याने शेती पिकांचे नुकसान होत असल्याने या संदर्भात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.पवन पाटील यांनी मुक्ताईनगर वीज कंपनीचे एक्झीकेटीव्ह अभियंता महेश पाटील यांना धारेवर धरत जाब विचारला. शेतकर्यांची समस्या तातडीने न सोडवल्यास मुक्ताईनगर वीज कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
तहसीलदारांकडेही तक्रार
विद्युत रोहित्राअभावी शेतकर्यांच्या शेतातील गव्हासह हरभरा व केळी पिकाला पाणी द्यावे कसे? असा प्रश्नही पडला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात रोहित्र मिळाले नाही तर वीज कंपनी कार्यालयाला कुलूप लावून विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराची तक्रार मुक्ताईनगर तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी युवक तालुकाध्यक्ष सईद खान, तालुका कोषाध्यक्ष योगेश पाटील, शुभम पाटील, गोकुळ अटकाळे, पंढरी पाटील, धम्मपाल कोंगे, शहर सरचिटणीस अजिंक्य पाटील, केतन महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

