यावल तहसीलदारांना कोतवाल संघटनेतर्फे निवेदन
यावल- तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यावल तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुवर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावल येथील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, आमचे तलाठी सजेवर खाजगी व्यक्ति काम करीत आहेत. खाजगी काम करणारी व्यक्ती ही गाव पातळीवरील कोतवालांना विश्वासात न घेता परस्पर काम करीत असतात, खाजगी काम करणार्या व्यक्तिंना सजेवर कायमचा प्रवेश बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
खाजगी सजांवरील व्यक्तींना कमी करा
यावल तालुक्यातील तलाठी सजेवर काम करणार्यांपैकी तलाठी सजा यावल, फैजपूर, न्हावी, हिंगोणा, बामणोद, भालोद, अंजाळे, विरोदा या शिवाय आमोदा, किनगाव, साकळी, आडगाव, कोरपावली, कोळवद, चुंचाळे या गावातील तलाठी सजांवर खाजगी व्यक्ती काम करीत आहे. या उमेदवारांना तत्काळ कमी करण्यात यावे, यावल तालुक्यातील कोतवाल यांनी मागील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्हीपीएटी जनजागृतीसाठी काम केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी साहित्य वाटपाचे काम आपल्या आदेशान्वये केली आहेत त्याचा मोबदला (मानधन) अद्याप मिळालेले नाही तेदेखील तत्काळ मिळावे, अशा मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना देण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष ताराचंद मंगा तायडे, उपाध्यक्ष लिलाधर सोमा सपकाळे, कार्याध्यक्ष प्रल्हाद बळीराम बोरनारे, सचिव पंढरीनाथ किसन अडकमोल, सरचिटणीस सुरेश आर तायडे, जयश्री कोळी, शबाना तडवी, दीपाली बारी, सुमन हर्षल आंबेकर आदी कोतवालांच्या स्वाक्षर्या आहे. निवेदनासोबत महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाव्दारे 19 नोव्हेंबरच्या पत्राद्वारे कोतवालांच्या कर्तव्याबाबत उल्लेख करण्यात आलेला असून त्या अनुसार संबधीतांस कर्त्यव्ये पार पाडण्यासाठी कोणताही प्रतिबंध होणार नाही याची आपल्या स्तरावर नोंद घेण्यात यावी, असे महसुलचे उपसचिव राजेंद्र मारूती बेंगळे यांनी दिलेल्या महसुल व वन विभागाला देण्यात आलेल्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे.