कोरोनाचा फैलाव : लग्न समारंभासह सार्वजनिक जागांवर 50 वर व्यक्ती दिसल्यास दंड होणार वसुल
मुंबई : कोरोनाच्या नवीन विषाणूंचा काही देशांमध्ये प्रसार वाढला आहे. तर मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असतानाच गेल्या काही दिवसांत बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यानुसार आता लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी अचानक धाड टाकण्यात येणार असून त्या ठिकाणी मास्कचा वापर होत नसेल आणि 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास त्या व्यक्तीकडून दंड वसूल केला जाईल तसेच त्या-त्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.