गृहमंत्र्यांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट


परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : आरोपांमुळे राज्यात उडाली खळबळ ; गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप

मुंबई : अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इन्कार केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गंभीर आरोपांमुळे गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही : देवेंद्र फडणवीस 



आठ पानांच्या पत्रात गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. पत्रातील मुद्दे असे की, IPS परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं. सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

नाराजीतून बॉम्बगोळा
वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली होती. डीजी रँकमध्ये हे शेवटच्या दर्जाचं पद असल्याने एक प्रकारची शिक्षा केल्या सारखीच राज्य सरकारने सिंह यांना वागणूक दिली होती. त्यामुळे सिंह नाराज होते. अपराध केल्यासारखी ही वागणूक असल्यामुळे सिंह नाराज असल्यानेच त्यांनी आरोप केल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !