माजी मंत्री खडसेंना पहिल्या यादीत तिकीट न देणार्‍या भाजपा सरकारचा निषेध


भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील : दुसर्‍या यादीत सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास मोठा निर्णय घेणार

भुसावळ : सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपाने जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने भाजपा सरकारचा आम्ही निषेध करतो व दुसर्‍या यादीत खडसेंना सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास संपूर्ण बॉडीला विश्‍वासात घेवून पुढील भूमिका जाहीर करू, अशी माहिती भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. जामनेर रोडवरील हॉटेल मल्हारमध्ये त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

संघटना सामाजिक मात्र खडसे समाजाचे नेते
कुटुंबनायक रमेश विठू पाटील पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, भोरगाव लेवा पंचायत ही संघटना सामाजिक असून तिचा राजकारणाचा संबंध नाही मात्र खडसे हे लेवा समाजाचे नेते आहेत व आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. सलग 40 वर्षांपासून भाजपाचे काम करणार्‍या खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने पहिल्या यादीत स्थान न देवून हा समाजाचा एकप्रकारे अपमानच आहे. खडसेंना किमान दुसर्‍या यादीत स्थान देवून आता सरकारने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खडसेंना दुसर्‍या यादीत तिकीट न मिळाल्यास संपूर्ण बॉडीला विश्‍वासात घेवून आम्ही निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र काय निर्णय घेणार? याबाबत त्यांनी उत्सुकता कायम ठेवली.









  • रमेश विठू पाटलांच्या पत्रकार परीषदेतील मुद्दे
    हा सरकारवर दबाव नाही तर खडसेंना तिकीट न दिल्याने सरकारविषयी समाजाची नाराजी
    भोरगाव लेवा पंचायतीची मुख्य बॉडी ठरवेल तो निर्णय जाहीर करणार
    खडसेंवर अन्याय म्हणजे समाजावर अन्याय
    खडसेंना पत्रकार परीषदेपूर्वी दिली कल्पना, या विषयात न बोलण्याची केली विनंती
    रोहिणी खडसेंना उमेदवारीऐवजी खडसेंना उमेदवारी हा आमच्यासाठी सन्मान

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला अ‍ॅड.प्रकाश पाटील, डॉ.बाळू पाटील, पंचायतीचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी, गिरीश नारखेडे आदी भुसावळसह पाडळसेतील पंच मंडळी उपस्थित होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !