आयशर डंपरवर धडकली : दोघे मजूर जागीच ठार, सहा जखमी
पाचोरा : मजुरांना ऊस तोडणीीसाठी घेऊन जात असलेला आयशर बंद डंपरवर जाऊन धडकल्याने दोघा मजुरांचा जागीच करुण अंत झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात धानोरा ते भराडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी घडला. अपघात प्रकरणी आयशर चालकाला अटक केली.
बंद डंपरवर आयशर आदळून अपघात
तालुक्यातील लाख (तांडा), वरसाडे (तांडा), मोहाडी, हनुमानवाडी येथील सुमारे 25 ऊसतोड मजूर हे फलटन येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास आयशर वाहनाने निघाले असता पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान आयसर सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील धानोरा फाट्याजवळील बंद असलेल्या डंपरवर जावून आदळला. अपघातात कॅबीनमध्ये बसलेल्या कल्पना यमजी पवार (27, रा.मोहाडी) व प्रशांत विठ्ठल वाघ (30, रा. हनुमानवाडी) हे जागेवरच ठार झाले तर वाहनातील निलेश यमजी पवार (रा.मोहाडी, ता.पाचोरा), अनिल तंवर (रा.कुर्हाड तांडा, ता.पाचोरा), दादाभाऊ राठोड (रा.वरसाडे, ता.पाचोरा), मोहन भिल (रा.लाख तांडा), रुखमाबाई पवार (रा.वरसाडे, ता.पाचोरा), दादाभाऊ पवार (रा.वरसाडे, ता.पाचोरा) हे सहा जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान मयतांचे शवविच्छेदन ही सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मयत कल्पना यमजी पवार यांच्या पश्चात्य पती, दोन मुले, एक मुलगी असा परीवार आहे.

