हिंगोणा येथील मोर धरणात गुराख्याचा बुडाल्याने मृत्यू
यावल : तालुक्यातील हिंगोणा शिवारातील मोर धरणात बुडाल्याने गुराख्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुलशेर सुमार्या बारेला (52) असे मयताचे नाव आहे. यावल तालुक्यातील मोर धरण येथील रहिवाशी गुलशेर सुमार्या बारेला (52) हे गुरे चारण्याचे काम करतात. 22 ऑक्टोबर रोजी ते हिंगोणा शिवारातील मोर धरणाजवळ गुरे चारत असतांना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्यावेळी सोबत कुणीही नव्हते. दरम्यान दुसर्या दिवशी, 23 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. मृतेदह कुजलेला असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरेश्वर आखेगावकर, सुरदास चाटे यांनी भेट दिली. हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
