मुक्ताईनगरात बंद घर फोडले ; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
जळगाव : शहरातील मुक्ताईनगर परीसरात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे-चांदीचे दागिने व लॅपटॉपसह एकूण दोन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद चोरट्यांसाठी ठरली संधी
प्रणय प्रदीप भारंबे (31, रा.मुक्ताईनगर, जळगाव) हे कुटुंबियांसह राहतात. सोमवार, 25 ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी प्रणय भारंबे यांनी त्यांच्या मावसभावाला घराकडे लक्ष देण्याचे सांगितले होते. मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी गणेश कॉलनीतील मावसभावाने रात्री 10 वाजेपर्यंत घराकडे फेरी मारली होती. त्यावेळी सर्व व्यवस्थित होते. गुरूवार, 28 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात ठेवलेले चार तोळे सोन्याचे दागिने, दोन भार वजनाचे चांदी आणि डेल कंपनीचा लॅपटॉप असा एकूण दोन लाख दोन हजार रूपये किंमतीचा चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी गुरूवारी 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

