पत्नीचा खून करीत पतीची आत्महत्या : पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा : तालुक्यातील सावखेडा बु.॥ येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळल्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. सतीष धनसिंग परदेशी (38) व गायत्री सतीष परदेशी (32) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.
झोपेत आवळला पत्नीचा गळा
सावखेडा बु.॥, ता. पाचोरा येथे गुरुवार, 28 रोजी रात्री सतीष धनसिंग परदेशी ( 38), गायत्री सतीष परदेशी (32), 6 वर्षाचा मुलगा व 4 वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब निद्रावस्थेत झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान सतीष धनसिंग परदेशी याने गाढ झोपेत असलेल्या पत्नी गायत्री सतीष परदेशी हिचा दोन्ही हाताने गळा आवळून खून केला. घराबाहेर निघत असतांना आरडाओरड करून पळत असतानांच शेजारच्या घरी राहत असलेल्या त्याचा लहान भाऊ संदीप परदेशी यांच्या सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्याने सतीषचा पाठलाग करून त्यास पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली असता सतीषने सांगितले की, मी माझी पत्नी गायत्री हिचा गळा दाबून खून केला आहे. असे सांगताच सतिष त्याच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता संदिप ने घरात जाऊन बघितले असता गायत्री मृतावस्थेत आढळली तर दोघे मुले झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर सतीष परदेशीने गावाबाहेर पळत जाऊन येथील माजी सरपंच गोकुळसिंग नथ्थुसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती गळफास आवळला. गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी 9 वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिष धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.



पाचोरा ग्रामीण रुग्णालयता शवविच्छेदन
घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
