सार्वजनिक आरोग्य विभागाची उद्या गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा
नाशिक विभागात गट ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 परीक्षार्थीची नोंदणी
नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रीक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा राज्याच्या 17 जिल्ह्याच्या मुख्यालयी 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली होती तसेच गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा रविवार, 31 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात व काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतके परीक्षार्थी नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी पाचही जिल्हयात एकूण 129 शाळेमध्ये परीक्षेसाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक विभागात 53 हजार परीक्षार्थी
नाशिक विभागातील एकूण 53 हजार 326 परीक्षार्थींपैकी नाशिक जिल्हयात एकूण 27 हजार 03 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 65 शाळेमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे तसेच अहमदनगर जिल्हयात एकूण आठ हजार 191 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 11 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. धुळे जिल्हयात एकूण 3 हजार 14 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 06 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्हयात एकूण 7 हजार 991 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 27 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयात एकूण 7 हजार 127 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 20 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे.

कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे
वरील सर्व परिक्षा केंद्रांवर कोविड – 19 च्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आलेली असुन परिक्षार्थीनींही कोविड नियमाचे पालन करावे तसेच वरील सर्व 129 परिक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्या नेमणुका मे.न्यासा कंपनीमार्फत करण्यात आल्या असुन ही सर्व प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाकडुन मे.न्यासा कंपनीस देण्यात आलेली आहे. तरी देखील गट-ड संवर्गातील पुर्वनियोजित परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, यास्तव शासनाच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे परीक्षा केंद्र निरीक्षक म्हणुन प्रत्येक केंद्रावर नियुक्त केलेले आहेत. हे निरीक्षक मे. न्यासा कंपनीच्या परीक्षा आयोजन कार्यपध्दतीवर लक्ष ठेवणार असून कोणत्याही प्रकारचा अप्रिय किंवा अपप्रकार होवू नये, याकडे बारकाईने लक्ष देणार आहेत.
हे नवीन परीक्षा केंद्र
नाशिक जिल्हयातील परीक्षा केंद्र क्रमांक 6058 (डॉ. गुज्जर सुभाष हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देवळाली कॅम्प) हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलेले असून केंद्र क्रमांक 6071 (जनता इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दिंडोरी) हे नवीन परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. जुन्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींनी नवीन केंद्रावर जाण्याचे आवाहन मे.न्यासा कंपनीद्वारे करण्यात आले आहे, असेही डॉ. गांडाळ यांनी कळविले आहे.
अडचण आल्यास साधावा संपर्क
प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्या त्या जिल्हयाकरीता भरती प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. न्यासा कंपनीकडुन नाशिक आरोग्य परिमंडळातील पाचही जिल्हयासाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आलेले असुन त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. नाशिक जिल्हयासाठी ऋषीकेश उंडे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9730138760 असा आहे. अहमदनगर जिल्हयासाठी सारिका सायगावकर यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 8484868543 असा आहे. , धुळे जिल्हयासाठी हितेश बोरसे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 8007803920 असा आहे, जळगाव जिल्हयासाठी सानिका पवार यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9503351461 असा आहे. नंदुरबार जिल्हयासाठी अशोक पाटील यांची नेमणूक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 7020336014 असा आहे तसेच नाशिक मंडळाचे विभागीय व्यवस्थापक या पदावर महेश पाटील यांची मे.न्यासा कंपनीने नेमणूक केलेली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9673069484 असा आहे. परीक्षार्थीना काहीही अडचण आल्यास त्यांनी वरील आपल्या जिल्हयातील जिल्हा समन्वयक किंवा झोनल मॅनजर यांचेशी उपरोक्त दुरध्वनी संपर्क साधावा, असे आवाहनही आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
