लासलगावातील घटना : कंटेनरने एसटी चालकाला चिरडले
लासलगाव : शहरातील बसस्थानकासमोर एसटीला कंटेनरने कट मारल्यानंतर बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या एसटी चालकाला कंटेनर चालकाने धडक देत 100 ते 150 मीटरपर्यंत निर्दयीपणे फरपटत नेल्याने संदीप मांगुजी निकम या एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरचालक पसार झाला आहे. नाशिकसाठी बस (एम.एच.14 बीई 3641) आगारातून घेऊन येताना स्थानकासमोर कंटेनरने (एम.एच. 43 वाय 7463) बसला कट मारला. यानंतर कंटेनरचालक पळण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडला. कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील योगेश ऑटोमोबाइल्स व लतीफ स्प्रे पेंटिंग या दुकानात घुसल्याने दोन्ही दुकानांचे नुकसान झाले. त्यानंतर कंटेनरचालक कंटेनर सोडून पसार झाला. लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार कंटेनर चालकाचा तपास सुरू आहे. चालक, वाहक, कर्मचार्यांनी घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, यतीन कदम, डी. के. जगताप यांनी नातेवाइकांची समजूत काढली. मृत निकम यांच्या नांदगाव तालुक्यातील आमोदे या मूळ गावी संध्याकाळी उशिरा अंत्यविधी करण्यात आला. मृत निकम यांच्या नातेवाइकांनी जोपर्यंत एसटीकडून मदतीचे आश्वासन लेखी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिस आणि एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्यांची धावपळ उडाली.

