क्रेडीटकार्ड धारकाला 32 हजारांमध्ये ऑनलाईन गंडवले
जळगाव : अनोळखी नंबरवरून आलेल्या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दादावाडी येथे राहणार्या व्यक्तीची क्रेडीट कार्ड नंबरचा वापर करून 32 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
मुकेश बाळकृष्ण गुरव (41, रा.गुजराल पेट्रोल पंपाजवळ, दादावाडी) हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते खाजगी वाहनाचे चालकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेशेजारी कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. आपण एसबीआय क्रेडीट कार्ड वरून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना 32 हजार 786 रूपये कट होण्यासंदर्भात मॅसेज आला. त्यांनी अॅपच्या माध्यमातून आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून चौकशी केली असता 32 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुकेश बाळकृष्ण गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायंकाळी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रामभाऊ बडगुजर करीत आहे.

