दुचाकीस्वार बसवर धडकला : एस.टी.थांबताच मागून धडकली दुचाकी : तिघे जखमी
चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा : वाघळी-बोरखेडा रस्त्यावरील घटना
चाळीसगाव : पाचोरा-भडगाव मार्गे चाळीसगाव येथे जाणार्या बसला समोरून दुचाकीधारकाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याची घटना वाघळी ते बोरखेडा रोडवर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जण किरकोळ जखमी झाले आहे.
3 रोजी अपघात
पाचोरा बस आगाराची बस (एमएच 14 बीटी 2333) ही 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाचोरा भडगाव मार्गे चाळीसगाव कडे जाण्यासाठी निघाली. रस्त्यावरील वाघळी ते बोरखेडा दरम्यानच्या (हॉटेल एमएच 19) जवळ बसच्या समोरून येणारी (एमएच 19 डीएम 2280) क्रमांकाच्या दुचाकीस्वार प्रतिक ज्ञानेश्वर पाटील (रा. डांभूर्णी ता. यावल जि.जळगाव) हा भरधाव वेगाने येवून बसवर धडकला. यात बस चालक दीपक शांताराम पाटील (36, रा.धरणगाव) यांनी प्रसंगावधानामुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे परंतु बसच्या मागे येत असलेली (एम.एच. 19 ए.क्यू.4049) क्रमांकाची दुचाकी बसला धडकली. यात भरत लहू पाटील आणि त्यांची पत्नी मनिषाबाई लहू पाटील (रा. नेरी, ता. पाचोरा, जि.जळगाव) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. बसचालकाच्या फिर्यादीवरून बसला समोरून धडक देणारा दुचाकीस्वार प्रतिक पाटील याच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.

