पिंप्राळ्यातील तरुणाला सर्पदंश : उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : पिंप्राळा येथील तरुणास 31 ऑक्टोबर रोजी सर्पदंश झाला होता. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी पूजनाला ही अप्रिय घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त झाली. मुकेश भिवा सोनवणे (30, रा.कोळीवाडा, पिंप्राळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुकेश सोनवणे हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रॅक्टरने टिलर करत असताना लोखंडी नागरात कचरा अडकला होता. कचरा काढण्यासाठी सोनवणे ट्रॅक्टरवरून खाली उतरले. कचरा काढताना सापाने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला. त्यानंतर ते ग्लानी येऊन ते बेशुद्ध झाले होते. नागरीकांनी त्यांना जीएमसीत दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला.
