नाना पाटलांची याचिका फेटाळली : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघात भाजपचे उमेदवार नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यानंतर मुक्ताईनगर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या दोघांपैकी एक जण माघार घेणार असल्याने खडसे कुटुंबाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नाना पाटील आणि दिलीप पाटील या दोघांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरले होते. निवडणूक निर्णय अधिकार्याने बाद ठरवलेल्या अर्जाच्या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दोन्ही ठिकाणी या उमेदवारांचे अपील फेटाळण्यात आले असून, त्यांची उमेदवारी नाकारल्याचा निर्णय योग्य ठरवण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांनाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सोमवारी माघारीच्या दिवशी अधिकृत घोषणा होणार आहे.

