पाचोर्‍यात चोरट्यांची ‘दिवाळी’ : एकाचवेळी पाच घरे फोडली


पाचोरा : दिवाळी उत्सवामुळे नागरीक बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. शहरासह तालुक्यात एकाचवेळी चोरट्यांनी पाच बंद घरे फोडत घरातील सोन्या चांदीच्या दागिण्यांसह रोकड लांबवल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त हेात आहे.

घरफोडीने पसरली भीती
शहरातील अरीहंत नगरमधील फळ विक्रेता संजीव सुक्राम चौधरी हे शनिवारी चोपडा येथे त्यांच्या बहिणीकडे भाऊबीजनिमित्त गेले असता चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोंडा तोडून घरातील कपाटातून सोने चांदिच्या दागिण्यांसह सुमारे दिड लाख रुपयांचा ऐवज लांबवला. वरठाण, ता.सोयगाव येथील रहिवासी असलेले व रावेर तालुक्यात प्राथमिक शिक्षक असलेले किशोर तुळशिराम चौधरी हे शनिवारी वरठाण येथे कुटुंबीयासह गेलेले असतांना त्यांच्याही घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून कपाटातील सोने चांदीच्या दागिण्यांसह सुमारे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे ऐवज चोरीला गेला. शहरातील श्री. गो. से. हायस्कूल जवळ राहत असलेल्या व कोपरगाव येथे ठिबक सिंचन कंपनीत नोकरीस असलेल्या धनंजय राजाराम नेवे हे भाऊबीज निमित्त बर्‍हाणपूर येथे मुक्कामी गेले असताना त्यांच्याही घराचा दरवाजाचा कडी-कोंडा कटरने कापून कपाटातील 74 हजार रुपये रोख, साडे आठ ग्राम सोने व सात ग्रॅम चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्या व्यतिरिक्त शहरात दोन ठिकाणी वरील प्रमाणेच कटरने कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोने चांदी चोरून नेले. याप्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान बडगुजर करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !