बस वाहकाला शिवीगाळ करीत मारहाण : आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी


जळगाव : बस प्रवासात अर्धे तिकीटाचे कार्ड नसतांना अर्धे तिकीट काढून बस वाहकाला शिविगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी प्रवाश्याला दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तुळशीराम हरलाल राठोड (65, रा.विसापूर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

तीन वर्षांपूर्वी झाली होती मारहाण
21 सप्टेबर 2018 रोजी तुळशीराम हरलाल राठोड हा चाळीसगाव-मालेगाव बसमध्ये (एम.एच.19 बी.टी.1342) या बसने प्रवास करीत होता. बसमध्ये चालक महेश देवचंद चव्हाण हे कर्तव्यावर होते तर वाहक महेश चव्हाण यांनी तिकीटासंदर्भात प्रवाशी तुळशीराम राठोडला विचारणा केली असता अर्ध्या तिकीटासाठी लागणारे एसटी महामंडळाचे किंवा पुरावा म्हणून काहीही नसतांना राठोडने अर्धे तिकीट मागितले. अर्ध्या तिकीटासाठी लागणारे कार्ड जवळ नसल्यामुळे पुर्ण तिकीट काढावे लागेल, असे वाहक चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारहाण केली व शिविगाळ केली. ‘तुझ्याकडून काय होते ते करुन घे’ असे म्हणत धमकी दिली होती. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड
न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर न्यायाधीश एस.एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकार पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने तुळशीराम राठोड याला दोषी धरुन दोन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !