विना परवानगी फलक लावल्यास खबरदार ! जळगावात चौघांविरोधात गुन्हे
जळगाव : विना परवानगी फलक लावणार्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील बसस्थानक, आकाशवाणीचौक, बहिणाबाई चौक, महाबळ, ख्वॉजामिया चौक या भागात विना परवानगी लावलेल्या फलकांवर शुक्र्रवार, 12 नोव्हेंबर रोजी महापालिकेने कारवाई केली होती. याप्रकरणी चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
जळगाव शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक रीसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली असता या फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले. त्यानुसार महापालिकेने कारवाई करीत सर्व फलक जप्त केले. याप्रकरणी रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्या चेतन किशोर शिंपी (पोलीस कॉलनी), चंदू आण्णानगर, निलेश संजय जोशी, सुनील विजय देशमुख, मिलिंद रमेश नाईक (तिघे रा. जळगाव) या चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.

