जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी लांबविला
जळगाव : शहरातील घाणेकर चौकातून पायी जाणार्या तरुणाच्या हातातून दुचाकीवरून येणार्या अज्ञात दोन जणांनी हातातील मोबाईल लांबवला. प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गिरीश समाधान माळी (22, रा.कांचन नगर, जळगाव) हा तरूण सोमवार, 13 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरटे दुचाकीवर आले. चोरट्यांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीवर पसार झाले. तरूणाने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले होते.
शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी गिरीश माळी या तरूणाने गुरूवार 16 डिसेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.





