अल्पवयीन मुलीवर अत्याचार : संशयीताचा जामीन फेटाळला
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या संशयीत आरोपीने जामिनासाठी शुक्रवारी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने सुनावणीअंती जामीन अर्ज फेटाळला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विनोद मधुकर लोंढे याने कचरा फेकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता घडली होती. दिवसभर मुलीला डांबून ठेवल्यानंतर सायंकाळी तिला तिच्या घराजवळ सोडून देण्यात आले. मुलीने ही संपूर्ण घटना आईला सांगताच पीडितेच्या आईने लागलीच रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार विनोद लोंढे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीने जामीन मिळावा यासाठी शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी दुपारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर कामकाज होवून न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड.सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.





