तोतया पोलिस जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
तोतया पोलिस जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : तोतया पोलिसांना जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
जहीर महंमद नूर महंमद (28, रा.भिलपुरा चौक, मरीमाता मंदिराजवळ, जळगाव) आणि जुबेरखान वाहब खान (21, रा.इस्लामपुरा, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी एकाच्या ताब्यातील मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने या प्रकरणी जिल्हापेठ दाखल गुन्ह्याचा उलगडाही झाला आहे.








पोलिस असल्याचे सांगत लांबवला मोबाईल
या घटनेतील फिर्यादी शौचालयात गेला असता दोघा आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. दोघांपैकी एक त्याच्यासोबत आत गेला व एक बाहेर थांबला. फिर्यादी बाहेर आल्यानंतर बाहेर थांबलेल्या इसमाने आपण पोलिस असल्याची त्याला बतावणी करत त्याच्यावर रुबाब सुरु केला. आरोपींची बारीक हेअर कटिंग बघून फिर्यादी घाबरला. दोघा आरोपींनी शिताफीने त्याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेत तेथून पलायन केले होते.
जिल्हा पेठ पोलिसात दाखल आहे गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते. तांत्रिक मदतीच्या आधारे जहीर महंमद नूर महंमद (28, रा. भिलपुरा चौक मरीमाता मंदिराजवळ, जळगाव) आणि जुबेरखान वाहब खान (21, रा.इस्लामपुरा, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यातील मोबाईल दोघांकडून हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक शांताराम पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, सचिन महाजन, चालक अशोक पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.