1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा मृत्यू
मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी (1993 Mumbai Bomb Blast) याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाकिस्तानमधील कराची येथे आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
257 लोकांची झाली होती हत्या
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात (1993 Mumbai Bomb Blast) तब्बल 257 लोकांची जीव गेला होता. तर 713 गंभीरीत्या जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील एकूण 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. पहिला स्फोट मुंबई शेअर बाजाराजवळ पहाटे दीड वाजता झाला होता. तर शेवटचा स्फोट पहाटे 3.30 वाजता झाला होता. 2007 साली या प्रकरणातील खटल्याच्या पहिल्या टप्प्यात टाडा न्यायालयाने याकुब मेमनसह 100 आरोपींना दोषी ठरवले होते, तर 23 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.




सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य
मुंबई पोलिस सूत्रांनी रविवारी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली असून सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता. सलिम गाझी छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. दाऊदसोबतही त्याचे जवळचे संबंध होते . सलीम गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याच्याही काही बातम्या समोर आल्या होता. सलीम गाझीला हाय ब्लडप्रेशरसह अन्य आजारही होते. दरम्यान, आता शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती आलं आहे. 1993 साली मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटात सलीम गाझी (Saleem Gazi) व्यतिरिक्त छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि त्याच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. या हल्ल्यात सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला होता तर 600 हून अधिक लोक जखमी झाले होते.