सात वर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचार
नवी दिल्ली : लग्नाच्या वरातीत नाचण्यात सर्वजण मग्न असताना एका 7 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील बेगुसरायमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ज्या घरात लग्न होतं त्याच घरातील मुलीचं आरोपीनं अपहरण केलं होतं. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार होता.
अपहरण करीत शेतात केला अत्याचार
संबंधित घटना 21 मार्च सोमवारची आहे. बेगुसराय जिल्ह्यातील एफसीआय ओपी परिसरात झालेल्या एका लग्न समारंभातून आरोपीनं सात वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं होतं. आरोपी मोहम्मद जमशेद उर्फ कारुआ हा तरुणीचा शेजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीनं मुलीचं अपहरण करून तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपीनं मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी मुलीला बेशुद्धावस्थेत सोडून पळून गेला. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता, मुलगी बेशुद्ध अवस्थेत शेतात आढळून आली.

आरोपीला अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तपासाअंती पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं, जिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितलं की, डीएसपी अमित कुमार आणि मुख्यालयाचे डीएसपी निशित प्रिया या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. त्याचवेळी पोलिसांच्या पथकानं आरोपीला अटक केली आहे.
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर एफएसएल टीमनं घटनास्थळावरून पुरेसे पुरावे गोळा केले आहेत. एसपींच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केलं जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतील. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


