प्रेमसंबंध उघड करण्याची पुतणीला धमकी देत नराधम काकाने केला अत्याचार
बीड : पुतणीचे प्रेमसंबंध उघड करेल, अशी धमकी नराधम काकाने देत पुतणीवरच अत्याचार करीत ब्लॅकमेल केले. तब्बल चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. बीड तालुक्यातील एका गावातील या घटनेने खळबळ उडाली आहे.
जीवे ठार मारण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार
मूळ बीड तालुक्यातील गाव असलेली पीडित मुलगी आई-वडिलांसोबत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास आहे. तेथे ती सध्या पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. 25 एप्रिल 2018 रोजी शाळेला सुट्या लागल्याने ती गावी आजी – आजोबांकडे आली होती. यावेळी तिच्याकडील मोबाईल घेऊन 40 वर्षीय चुलत्याने तू तुझ्या मित्रासोबत बोलू नको, माझ्यासोबत प्रेम कर, असे म्हटले. त्यानंतर 28 एप्रिल 2018 रोजी त्याने तिच्याशी बळजबरीने कुकर्म केले. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे पीडिता पुण्याला परत गेल्यावर तेथे येऊन चार ते पाचवेळा जबरदस्तीने अत्याचार केला. डिसेंबर 2020 मध्ये त्याने शेवटचा अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला. यावर पीडितेच्या आई-वडिलांनी गावी येऊन त्यास समज दिली मात्र त्याने धमकी देत तुमची मुलगी गावी आणून सोडा, अन्यथा तिची बदनामी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. तपास पिंक मोबाइल पथकाकडे वर्ग करण्यात आला.




