दीपनगरात स्टिम टर्बाइनचे लिफ्टिंग मात्र उर्जा मंत्री म्हटले बॉयरल लिफ्टींग केले
तुटवडा मिटरचा कि पोलचा ?; डिमांडनोट भरुनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन का दिले जात नाही : उर्जा मंत्री नितीन राऊतांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची केली खरडपट्टी
भुसावळ : शेतकऱ्यांनी कृषी कनेक्शनसाठी डिमांडनोट भरली मात्र त्यांना नवीन वीज कनेक्शन का दिले नाही? वीज मिटरचा तुटवडा तर कधी पोल नसल्याचे सांगितले जाते, तुटवडा कशाचा ते आधी निश्चित करा. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी नेमक्या अडचणी काय? असा सवाल करुन उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. दीपनगर औष्णिक केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या सभागृहात उर्जा मंत्री राऊत यांनी शुक्रवारी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व विद्यूत निरीक्षकांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाची माहिती जाणून घेतली. उर्जामंत्र्यांच्या हस्ते स्टिम टर्बाईनचे लिफ्टींग झाले, मात्र त्यांनी माध्यमाशी बोलताना बॉयलर लिफ्टींग केल्याचे सांगितले. उर्जामंत्र्यांना नेमके आपण कशाचे पुजन व शुभारंभ केला तेच माहित नसल्याची बाब समोर आली.
यांची होती उपस्थिती
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दीपनगर औष्णिक केंद्रात पाहणी व स्टिम टर्बाईन लिफ्टींगचा शुभारंभ केला. यावेळी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जामनेरच्या जोस्ना विसपुते, महानिर्मितीचे प्रकल्प संचालक संजय गारुडकर, ६६० मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, ५०० बाय दोन वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मनोहर तायडे, एन. आर. मुंडे, काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. उर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी प्रथम दीपनगर ५०० मेगावॅटच्या पीसीआर विभागाला भेट देवून पाहणी केली. वीजनिर्मिती व कोळशाचा धावता आढावा घेतला. ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या स्टीम टर्बाइनचे लिफ्टींग कामाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यानंतर ६६० मेगावॅट प्रकल्पात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आदी विभागाच्या परिमंडळ मुख्य अभियंत्यांसोबत आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या प्रश्नावरुन घेतले. अधिकाऱ्यांकडून कधी पोलचा तर कधी मिटरचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मात्र नेमका तुटवडा का आहे? यावर मार्ग काढून डिमांडनोट भरुनही वीजकनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कनेक्शन दिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबत परिमंडळात वीजेची गळती व थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याने वीजेची गळती कमी करा, यासाठी वीजचोऱ्या थांबवा तसेच थकबाकी वसूल करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जून २०२३ पर्यंत प्रकल्प होईल काय?
उर्जा मंत्री राऊत यांनी आढावा बैठकीत दीपनगर ६६० मेगावॅट प्रकल्पाची स्थितीही जाणून घेतली. मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी हा प्रकल्प जून २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र कोरोनामुळे विलंब झाल्याचे सांगितले. यावर उर्जा मंत्र्यानी आता सुधारीत नियोजनानुसार जून २०२३ पर्यंत तरी चाचणी होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला. यावर रोकडे यांनी याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकल्पाची संपूर्ण माहिती व त्यापासून राज्याला होणार फायदा याबाबतची माहिती त्यांनी आढावा बैठकीतून घेतली.
प्रश्न व उत्तरही चूकीचे
६६० मेगावॅट प्रकल्पात १२२ टन वजनाच्या एचपी मॉड्यूलर स्टिम टर्बाइनच्या लिफ्टींगचा शुभारंभ केल्यानंतर डॉ. राऊत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी या प्रकल्पाचे उद्घाटन आपण केले? याबाबत काय वाटते असा प्रश्न विचारला. मुळात हे उद्घाटन नसून बॉयलर लिफ्टींगचा शुभारंभ असल्याचे यावर राऊत यांनी सांगितले. दीपनगरात मात्र बॉयलर लिफ्टींग नव्हे तर टर्बाइन लिफ्टींगचा शुभारंभ झाला. उर्जामंत्र्यांनाही आपण नेमके कशाचे पुजन व शुभारंभ केला, याची माहिती नसल्याची बाब यामुळे उघड झाली.
अडीच तास लेटलतीफ
उर्जा मंत्री राऊत हे दीपनगर केंद्रात बुधवारी १२ वाजता पोहोचणार होते. तर दुपारी दोन वाजेपासून त्यांची पाहणी व आढावा बैठक होती. मात्र ते दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेच्या दरम्यान दीपनगर केंद्रात पोचले. आढावा बैठकीसाठी अधिकारी १२ वाजेपासून ताटकळत होते. उर्जामंत्री तब्बल अडीच तास लेटलतीफ झाले. दौऱ्याच्या नियोजनात जामनेर तालुक्याला भेट देण्याबाबत नियोजन नव्हते, मात्र दुपारी रावेर, यावल तालुक्यातील कार्यक्रम आटोपून त्यांनी जामनेर गाठले, यामुळे नियोजीत आढावा बैठक व सर्व कार्यक्रम अडीच तास लेट झाले.