अट्टल दुचाकी चोरट्याच्या ताब्यातून 11 चोरीच्या दुचाकी जप्त
चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : जळगावसह धुळे व गुजरात राज्यातून लांबवल्या दुचाकी
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी पातोंडा गावातील अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून संशयीताच्या ताब्यातून चार लाख रुपये किंमतीच्या तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्याने जळगावसह धुळे व गुजरात राज्यातून या दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. दरम्यान, चेचीस क्रमांकाच्या आधारावर आता पोलिस प्रशासनाकडून दुचाकी मालकांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर रावते (पातोंडा, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
चाळीसगावातील आसीफखान जब्बारखान यांच्या मालकीची 40 हजार रुपये किंमतीची सीडी डिलक्स मोटारसायकल चोरट्यांनी घाटरोड मार्केट परीसरातून मंगळवार, 17 मे रोजी लांबवली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील व निलेश पाटील यांना आरोपी विठ्ठल रावते याबाबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यास ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व चौकशीदरम्यान आरोपीने आसीफ खान यांची चोरलेली दुचाकी काढून देत अन्य चोरलेल्या 10 दुचाकींची कबुली दिली. दरम्यान, आरोपीने या दुचाकी मालेगाव, धुळे, चांदवड, अमळनेर, नांदगाव, येवला तालुका तसेच गुजरात राज्यातून चोरल्याची कबुली दिली आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के.के.पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, सचिन कापडणीस, हवालदार अभिमन पाटील, पोलिस नाईक राहुल सोनवणे, दीपक पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, पवन पाटील, शरद पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
वाहनधारकांना प्रथमच मोठा दिलासा : इंधनाच्या दरात मोठी कपात : जाणून घ्या नेमके दर







