रावेर पालिकेच्या प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन
रावेर : रावेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या आणि प्रारूप मतदार याद्यामध्ये केलेल्या घोळाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी दिली.
नेत्यांच्या दबावाखाली मतदार यादी
नगरपालिका प्रशासनाने नुकतीच प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या मात्र याबाबत जनतेत अत्यंत नाराजी व संभ्रम निर्माण झाला आहे काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्यांच्या फायद्यासाठी चुकीची प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. चुकीच्या प्रभाग रचनेवर रावेर मुख्याधिकार्यांकडे हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी होऊन नागरीकांच्या हरकती 2 जून रोजी नाशिक आयुक्तांनी फेटाळून लावल्या. त्यानंतर 21 जून रोजी नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ असून बाहेरगावच्या मतदारांची नावेदेखील समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे तसेच दुसर्या प्रभागातील मतदारांचीदेखील नावे समाविष्ट करण्यात आली आहे.

याचिका दाखल करून न्याय मागणार
याबाबत गुरुवार, 23 जून रोजी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्याधिकार्यांकडे हरकत घेतली होती तसेच नागरीकांनीदेखील मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या. हरकती घेण्याची अंतिम मुदत सोमवार, 27 जून होती. नागरीकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हरकती घेतल्या परंतु नगरपालिका प्रशासनाने हरकतीची गंभीर दखल न घेता राज्य निवडणूक आयोगाच्या परीपत्रकाप्रमाणे प्रभागात प्रत्यक्ष न जाता कोणतेही स्थळ निरीक्षण न करता मंगळवार, 28 जून पासून हरकती फेटाळण्याची सुरुवात केल्याने नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागणार असल्याचे पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन यांनी कळवले आहे.