Chalisgaon rural police station employee in Dhule ACB net चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचा कर्मचारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
तीन हजारांची लाच भोवली : कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ
Chalisgaon rural police station employee in Dhule ACB Net चाळीसगाव : विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर अटकेची कारवाई करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजारांची लाच स्वीकारणार्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक देविदास ठाकूर (48, प्लॉट नंबर दोन, श्री गणेश पार्क, रो हाऊस, रूम नंबर सात, खरजई नाका, चाळीसगाव) यास धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
तडजोडीअंती स्वीकारली तीन हजारांची लाच
तक्रारदाराच्या बहिणीचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींशी वाद सुरू असल्याने ती भावाकडे आली होती व या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींवर कारवाई कधी करणार याबाबत विचारणा करण्यासाठी मंगळवारी तक्रारदार गेल्यानंतर आरोपी हवालदार दीपक ठाकूर यांनी पाच हजारांची मागणी केली मात्र तीन हजारात तडजोड झाल्यानंतर आजच लाचेची रक्कम देण्यासाठी ठाकूर यांनी आग्रह धरल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. पोलिस ठाण्याच्या आवारातच आरोपीला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, जगदीश बडगुजर, प्रवीण पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
दोन महिन्यांपूर्वीच झाला होता ट्रॅप
विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारात तडजोड करून लाच स्वीकारणार्या चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (52, रा.वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (38, रा. चाळीसगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवार, 28 जुन 2022 रोजीसायंकाळी सात वाजता सिग्नल चौकात रंंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलाचे नाव पुन्हा बदनाम झाले आहे.