साहित्यात हरवलेला बाप, कर्तव्याचे ओझ बिनशर्त वाहत राहिला


प्रा.पंकज पाटील : स्व.भागवत झोपे स्मरणार्थ व्याख्यानमाल

वरणगाव : युगपुरुष व भारतभूमीला स्वातंत्रय देणार्‍या महान योध्यांना घडवण्यात जेवढी भूमिका मातेची आहे त्याहून श्रेयस्कर भूमिका ही त्यांच्या वडिलांची आहे परंतु इतिहासाने आपल्यासमोर केवळ मातेचे महत्त्व कथन केलं आणि रणांगणावर झुंजणारा बाप मात्र दुर्लक्षितच राहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या जिजामाता आम्हाला सांगितल्या गेल्या मात्र त्याच वेळी निजामांच्या प्रस्थापीत सत्तेला छेद देण्यासाठी व शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणार्‍या शहाजी राजेंची झालेली ओढाताण इतिहासाच्या पानांच्या आड जात राहिली, असे प्रतिपादन प्रा.पंकज पाटील यांनी येथे केले. स्व.भागवत झोपे यांच्या स्मरणार्थ चाललेल्या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प भुसावळ येथील जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सौ.के.एस.गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंकज पाटील यांनी गुंफले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत हरी बढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष नीळकंठ झोपे, सचिव प्रशांत पाटील, संचालक अतुल झांबरे, डॉ.भागवत पाटील, दिलीप झोपे, रमेश सरोदे, सुरेश पाटील, माजी सरपंच तुषार पाटील, चंद्रशेखर झोपे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. ए.वाघ आदी उपस्थित होते.

बाप बिचारा कर्तव्याच ओझ बिनशर्त वाहत राहिला
प्रा.पंकज पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणार्‍या रमाई सांगितल्या गेल्या मात्र त्याच वेळी रामजी आंबेडकरांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत प्रसंगी भुकेले राहून डॉ.आंबेडकरांना शिकविले. भिमरावांनी जेव्हा वडिलांना विचारले की, स्वतः ला माझ्या करीता त्रास का करून घेत आहात ? तेव्हा रामजी उत्तरले की, तुझ्या कर्तव्याच्या उंचीने माझी खरी भूक भागणार आहे. तेव्हा शिक्षणाकडे अधिक लक्ष दे, यशोदा आणि देवकीचे प्रेम आम्हाला पुराण कथांमधून सांगितले जाते मात्र प्राणाची बाजी लावत डोक्याबरोबर पाण्यातून कृष्णाला जीवनदान देणारा वासुदेव मात्र दृष्टीच्या पल्याड जातो. आई म्हणजे दुधावरची साय असते , वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाय असते, असे लेखक-कवी सांगत आले मात्र बापाचं महत्त्व कथन करताना लेखणीला शाही कशी अपूर्ण पडते ? असे का घडत आले ? तर आजच्या शिक्षण व्यवस्थेने, इतिहासाने किंबहुना लेखक आणि कवी यांनीदेखील आम्हाला वेळोवेळी दर्शवली ती माय पण बाप बिचारा कर्तव्याच ओझ बिनशर्त वाहत राहिला, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पायतळी तुडवत राहिला, त्याग समर्पण हे जणू त्याच्या कपाळी गोंधळ गेलं आणि इतिहासाच्या पानातून ते आजच्या वर्तमानात देखील तुमच्या-आमच्या उघड्या डोळ्यांनाही तो दिसलाच नाही, असेही प्रा.पंकज पाटील यांनी यावेळी सांगितले.

व्याख्यानमाला स्तुत्य उपक्रम
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत बढेे सर म्हणाले की, कीर्तन सप्ताह आयोजित न करता आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी अशा प्रबोधनपर व्याख्यानमाला सुरू केल्यास भविष्यातील घडणार्‍या पिढीला एक चांगला मार्ग दाखवता येऊ शकतो, व्याख्यांमला नक्कीच स्तुती करण्यासारखी आहे.


कॉपी करू नका.