शिरसाळा मारोतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उमळली गर्दी

बोदवड : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या शनिवारनिमित्त शिरसाळा मारोती येथे हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परीसरात सुमारे 100 पेक्षा अधिक नवस होते. याच पार्श्वभुमिवर मंदिर परीसराने जत्रेचे रुप धारण केले होते. संपूर्ण परीसर गर्दीने गजबजलेला होता. सुमारे एक किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने यावेळेस सेवेकरी व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. सकाळी मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीने दुपारी ओसरते रुप घेतले. त्यानंतर संध्याकाळी आरतीच्या वेळेस भाविकांनी पुन्हा अलोट गर्दी करीत मारोतीरायाचे दर्शन घेतले. खान्देश, विदर्भ तसेच मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. यात मोठ्या प्रमाणात पायी पालख्यांचा जास्त प्रमाणात समावेश होता. सकाळी बोदवड येथील महाकाल फाऊंडेशनच्या युवकांतर्फे फराळ वाटप करण्यात आला. दसरखेडा येथील युवकांतर्फे दर शनिवार प्रमाणे शिरसाळा मारोती मंदिर परीसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सुप्रसिद्घ धार्मिक स्थळ शिरसाळा मारोती येथे भाविकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या स्थळास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाविकांतर्फे करण्यात येत आहे.


