वरणगावच्या विवाहितेची आत्महत्या : आरोपी पतीस सात वर्ष शिक्षा व दंड


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील विवाहितेचा चारीत्र्याच्या संशयावरून तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी आरोपी पती छळ करीत असल्याने या छळास कंटाळून विवाहितेने 19 मार्च 2018 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध वरणगाव पोलिसात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपी पतीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.आर.आर.भागवत यांनी सात वर्ष शिक्षा व 11 हजार रुपये दंड सुनावला. वरणगाव येथील विवाहिता भारती निलेश भोई हिचे 2012 मध्ये लग्न झाल्यानंतर पती चारीत्र्याच्या संशयावरून छळ करीत असल्याने तिने अंगावर रॉकेल ओतून 19 मार्च 18 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताच्या भावाने फिर्याद दिल्यावरून आरोपी पती निलेश सुकलाल भोईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्या.आर.आर.भागवत यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस सात वर्ष शिक्षा तसेच 11 हजारांचा दंड सुनावला. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.प्रवीण पी.भोंबे यांनी काम पाहिले. तपासाधिकारी म्हणून तत्कालीन उपनिरीक्षक निलेश वाघ यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.