रावेर लोकसभा मतदारसंघात होणार्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार

शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांची भुसावळातील पत्रकार परीषदेत माहिती
भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघात येणार्या आगामी पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परीषदेच्या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याची माहिती शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. रविवारी सायंकाळी उशिरा भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थेतही परीणाम होणार
पारकर पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. संपूर्ण देशभरात महाराष्ट्राने राबविलेला या पॅटर्नची चर्चा होत आहे. सत्तेच्या या नवीन प्रयोगामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. याचे परीणाम यापुढे होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही होण्याचे संकेत आहे. वरणगाव येथील या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांसोबत त्यांनी बैठक सुद्धा घेतली आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिलेले असून आपण दोन पाऊल पुढे येऊन निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या असून पदाधिकार्यांचे मेळावे व विविध शिबिर घेतली जाणार आहे. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकर्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचे जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल. याशिवाय नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नगरसेवक मुकेश गुंजाळ सेनेत नाहीत
पारकर म्हणाले की देशात आर्थिक मंदी आहे परंतु केंद्र सरकार भलत्याच मुद्यांवर कार्य करीत असून देशातील जनतेची दिशाभुल केली जात आहे. उद्योग धंदे, विकास, रोजगार यावर चर्चा होऊ दिली जात नाहीय असे ते म्हणाले. मोठ्या पक्षात गटबाजी असतेच त्यांची खान्देशमध्ये मोठ-मोठी उदाहरणे आहे. भुसावळ येथील स्थानिक पातळीवर भुसावळमध्ये गटबाजी संपुष्टात आणली असून पक्ष व पदाधिकारी विरोधी कार्य करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिली. भुसावळमधील एकमेव नगरसेवक मुकेश गुंजाळ हे पक्षातील बैठका व कार्यात सहभागी होत नसल्याने ते सध्या शिवसेनेत नाही, अशी माहिती पारकर यांनी दिली. पक्ष व स्थानिक पदाधिकार्यांच्या विरोधात काम करणार्यांना पक्ष शिस्त नियमानुसार हकालपट्टी करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले आहे.
शासनाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहचवणार -समाधान महाजन
राज्य शासनाच्या जनतेच्या हितासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरीकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. शिवसेना पक्षाची भूमिका आणि कार्य तळागाळातील नागरीकांना समजावून सांगू कारण विरोधक विनाकारण अडचणी निर्माण करण्याचा प्रयत करीत आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेत रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख उषा मराठे, उपजिल्हा प्रमुख डॉ.मनोहर पाटील, उपजिल्हा संघटक रवींद्र पवार, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, तालुका प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, उपशहर संघटक नबी पटेल आदी उपस्थित होते.


