नाशिक स्फोटाने हादरले : जिंदाल कंपनीत स्फोट ; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर
Nashik rocked by blast : Blast At Jindal Company; Two Dead, Four Seriously नाशिक : नववर्षाच्या प्रारंभीच मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू ओढवला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ईगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला-वाडीव-हे औद्योगिक वसाहतीत तुलनेने सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या मुंढेगाव शिवारातील आणि मुंबई आग्रा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म प्रा.लिमिटेड या कारखाण्यातील पॉलीफायर या प्लांटला रविवारी सकाळी 11 वाजता अचानक आग लागली. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
दहा किलोमीटरपर्यंत बसले हादरे
या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचे मोठे लोळ वरती आकाशात निघत होते. ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाक्यांना भिनली. त्यामुळे आगीने अजुनच जास्त भड़का घेतला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमीपर्यंत गावांमध्ये जोरदार हादरे बसून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. दौंडत, मुंढेगाव, माणिकखांब, मुकणे, पाडळी देशमुख, शेनवड खुर्द, पाडळी फाटा आदी सुमारे नऊ ते दहा गावचे नागरीक भयभीत झाले आहेत. घरातील भांडे, इतर समान हादरे बसून खाली पडल्यामुळे क्षणभर भूकंप झाला की क़ाय यामुळे नागरीकांना काहीही कळत नव्हते.


दोन गावांना निर्माण झाला धोका
विशेष म्हणजे ज्या दोन केमिकल युक्त टाक्या जळून खाक झाल्या त्यांचे शेजारिच हजारों टन स्क्रैप मटेरियल ने पेट घेवुन आग वाढत आहे तर तिथेच सुमारे अठरा हजार लीटर क्षमतेची केमिकल भरलेली एक मोठी टाकी असुन आग त्या टाकीपर्यंत जात आहे जर या टाकिने पेट घेवून भड़का झालाच तर कारखान्यातील एक पेट्रोल पंप आणि इतर सर्वच ठिकाणी आग लागण्याची चीन्हे दिसत आहे. मुंढेगाव आणि मुकणे या गावाना धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
शासकीय आश्रमशाळा तत्काळ केली खाली
कंपनी शेजारीच असलेली आणि राज्यातील एकमेव तसेच जिल्हाभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना भोजन व्यवस्था करणारी मुंढेगाव शासकीय निवासी आश्रमशाळा प्रशासनाने आगीचे स्वरूप बघून तासाभरात खाली केली. या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. स्थानिक शेकडो पालकांनी या ठिकाणी आपले पाल्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती तर जिंदालमधून बाहेर पडलेले शेकडो कामगार भयभीत होऊन आश्रयीत झालेले दिसले.