यावल शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : भुसावळच्या चहा विक्रेत्याविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील एका गावाहून यावल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणार्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर चहा विक्री करणार्या तरुणाने विनयभंग केला. गेल्या काही दिवसापासुन तो अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता व तिच्या मोबाईल क्रमांकाची मागणी करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने त्याच्याविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पाठलाग करीत केला विनयभंग
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येते. बसस्थानकावरून महाविद्यालयात जातांना या अल्पवयीन मुलीचा यावल येथील बस स्थानकावरील चहा विक्रेता अशोक नानकराम दुधानी (40, रा.भुसावळ) हा गेल्या काही दिवसांपासुन पाठलाग करीत होता तर गुरूवारी या अल्पवयीन मुलीस एकटी पाहून तिच्याकडे तिच्या मोबाईल नंबरची मागणी केली आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. विद्यार्थीनीने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना हा प्रकार सांगितला व पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांना तत्काळ दुधानी यास ताब्यात घेतले व त्याच्याविरूध्द बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 पोस्को कलमा अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.


