जळगावात पुन्हा भीषण अपघात : आयशरच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या गहूखेड्याच्या तरुणाला ट्रॅक्टरने चिरडले
गहुखेड्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू : मित्र गंभीर जखमी
Another terrible accident in Jalgaon: A young man who fell on the road after being hit by an Eicher was crushed by a tractorजळगाव : भरधाव आयशरने दुचाकीस्वार मित्रांना धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तरुण रस्त्यावर पडले तोच भरधाव ट्रॅक्टर तरुणाच्या मानेवरून गेल्यानंतर गहूखेडा, ता.रावेर येथील तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा मित्र जखमी झाला. हा अपघात जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव शुक्रवारी दुपारी एक वाजता घडला. शहरात सातत्याने अपघाताची मालिका सुरूच आहे.
गहूखेड्याच्या तरुणाचा मृत्यू
या भीषण अपघातात प्रशांत भागवत तायडे (30, गहूखेडा, ता.रावेर ) असे मयताचे तर जयेश द्वारकानाथ पाटील (23, गहूखेडा, ता.रावेर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जळगावात अपघाताची मालिका कायम
प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र शुक्रवार, 6 जानेवारी रोजी सकाळी रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एम.एच.19 सी.पी.2355) बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी एक वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.8167)ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 ए.एन.2438) वाहनाखाली प्रशांत तायडे आल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभीर जखमी झाला.
पोलिसांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यात जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत नागेश्वर तायडे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने तायडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतेे.
