मराठा विद्या प्रसारक मंडळातील अपहार प्रकरण : अॅड.विजय पाटलांसह दोघांविरोधात गुन्हा
Maratha Vidya Prasarak Mandal Embezzlement Case : Case Against Two Including Adv.Vijay Patil जळगाव : जळगावातील मराठा विद्याप्रसारक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्या प्रकरणी अॅड.विजय भास्कर पाटील यांच्यासह हेमंत साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
मराठा विद्या प्रसारक मंडळात भोईटे आणि पाटील गटातील वाद सर्वश्रृत आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांवर अनेकदा आरोप केले असून हे वाद पोलीस स्थानकात गेले आहेत. यात आज पुन्हा एका नवीन प्रकरणाची भर पडली असून पाटील गटाच्या दोघा मान्यवरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हापेठ पोलिसात दाखल झाला गुन्हा
शहरातील भोईटे नगरात निलेश रणजीत भोईटे हे वास्तव्यास असून ते मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मानद सचिव म्हणून दैनंदिन व प्रशासकीय कामकाज सांभाळत आहेत. त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, संशयीत विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्यासह इतर संचालक निवडून आले नसून ते संस्थेचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच संस्थेचे खोटे शिक्के तयार करुन त प्रोसेडींग बुकवर मारलेले आहेत.
खोटे इतिवृत्त तयार केल्याचा आरोप
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, सन 1998 ते 2002 या कालावधीसाठी चेंज रिपोर्ट सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल केला होता. परंतु सदरचा फेरफार अर्जासोबत दाखल केलेले दस्ताऐवज व पुराव्यानिशी शाबीत न करु शकल्याने संशयितांचा चेंज रिपोर्ट 22 फेब्रुवारी 2002 मध्ये फेटाळण्यात आला होता. खोट्या दस्तऐवजांच्या आधारे दि. 15 डिसेंबर 1997 रोजी मिटींग असल्याचे भासवून दि. 28 डिसेंबर 1997 रोजी निवडणुकीसाठी सभा घेतल्याचे प्रसेडींग बुक संशयितांनी तयार केले. संशयीत हे कायदेशीररीत्या संस्थेचे संचालक नसल्याने त्यांच्याकडे मूळ प्रेसेडींग बुक उपलब्ध नसतांना देखील त्यांनी सभेचा अजेंडा तयार करुन घेतला. तसेच खोटे इतिवृत्त तयार करुन विजय भास्करराव पाटील यांनी स्वत:ला मानद सचिव म्हणून निवडून आल्याबाबत घोषीत केले आहे. हे करण्यासाठी त्यांनी संस्थेचे खोटे प्रोसेडींग बुक तयार करुन त्यात खोेटे इतिवृत्त लिहीले. एवढेच नाही तर मिटींगमध्ये 22 संचालकांची निवड झाली असे देखील खोटे नमून करीत संस्थेचा ताबा घेण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला असल्याचे निलेश भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
