18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक


पारोळा : कापूस व्यापार्‍याकडे कामाला असलेल्या दोघांकडील 18 लाखांची रोकड मिरची पूड फेकून लुटल्याची घटना मंगळवार, 24 रोजी सायंकाळी साडेसात वाजता सबगव्हाण गावाजवळ घडली होती. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी लुटीचा बनाव उघडकीस आणत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भागवत सुरेश चित्ते (रा.न्यु बालाजी नगर, पारोळा), अमित बाबुसिंग परदेशी (रा.चाळीसगांव), हिंमत दामू महाजन (रा.महाजन वाडा, पारोळा), अमोल नदुंसिंग परदेशी (रा.उंदिरखेडा, ता.पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चाकूच्या धाकावर रक्कम लुटल्याचा बनाव
सबगव्हाण गावापुढे दुचाकीवरील दोघांनी भागवत सुरेश चित्ते व एकनाथ पाटील या कापूस व्यापार्‍याकडे कामाला असलेल्या कर्मचार्‍यांना धक्का मारून त्यांची गाडी खाली पाडली व चाकूचा धाकावर कापूस व्यावसायीक सुरेश पाटील यांचे 17 लाख 96 हजार 400 रुपये हिसकावून पोबारा केला होता. सुरुवाीला भागवत सुरेश चित्ते याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात तफावत आढळली तर एकनाथ पाटील यांनी भागवत चित्ते हा गाडी चालवत असताना कोणाशीतरी मोबाईलवरून बोत असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी उंदिरखेडा गावातून अमित बाबुलाल परदेशी याला त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने घटनेची कबुली देत लुटलेली सर्व रक्कम काढून दिली शिवाय या रस्तालुटीत त्याचा भाचा अमोल परदेशी हा देखील असल्याचे माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ आदींनी आरोपींच्या मुसक्या उधळत लुटीचा बनावट डाव उधळला.


कॉपी करू नका.