‘तो’ करायचा लाडूत गुंगीकारक औषध टाकून लूट ; उत्तरप्रदेशातील भामट्याच्या सतर्क भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने अखेर आवळल्या मुसक्या
Loot by putting Gungi medicine in Ladoo : Accused from UP in Bhusawal Railway Security Force’s net भुसावळ : रेल्वे प्रवासात प्रवाशांची गोड बोलून त्यांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देवून लुटणार्या युपीतील भामट्याला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. आरोपीविरोधात यापूर्वी ठिकठिकाणी सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. मिश्रीलाल द्वारका प्रसाद मौर्य (67, भवैरनगर, मेहनवण, जिल्हा-गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
लूट प्रकरणी दाखल होता गुन्हा
तक्रारदार शिवदास रामचंद्र पाटील (67) हे 5 जानेवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून अप 12860 गीतांजली एक्स्प्रेसने जळगाव-कल्यासण प्रवास करीत असताना आरोपी मौर्य याने त्यांना प्रवासात गुंगीचे औषध टाकलेला लाडू खाण्यास दिल्यानंतर त्यांची शुद्ध हरपताच आरोपीने त्यांच्याकडील एक लाख 11 हजारांचा ऐवज लांबवला होता. कल्याण आल्यानंतर प्रवाशाने रेल्वे पोलिसात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा भुसावळात वर्ग करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलाकडूनही या प्रकरणी तपास सुरू असताना शनिवार, 22 जानेवारी रोजी दुपारी दिड वाजता इन्स्पेक्टर बायनी प्रसाद मीना, स्टाफ कॉन्स्टेबल अरुण कुमार आणि कॉन्स्टेबल सागर वर्मा यांनी ट्रेन 01139 मध्ये मनमाड-नाशिक दरम्यान संशयीताला ताब्यात घेतल्यानतर त्याच्या बॅगेत 24 हजारांची रोकड, औषध टाकलेल्या लाडूंचा टिफीन बॉक्स, मेरफॅक्स औषधी बॉक्स, आधार कार्ड व कपडे आढळल्याने ते जप्त करण्यात आले.








