The famous Munjoba Yatra started at Atraval in Yawal Taluka अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थानावर पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतले दर्शन
यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिध्द जागृत मुंजोबा देवस्थानावर सोमवारी पहिल्याच दिवशी यात्रोत्सवात राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले तर शेकडोंनी नवस फेडले. डिजेच्या युगात आज ही अट्रावलमध्ये डफाच्या गजरात बालकांना नवस फेडण्यास निघालेल्या मिरवणूकांनी लक्ष वेधले होते. यावल एसटी आगारातून यात्रेसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
यात्रोत्सवाला 300 वर्षांची परंपरा
अट्रावल येथे भालोद रस्त्यावर श्री क्षेत्र मुंजोबा मंदिर आहे. या मुंजोबा मंदिराचे निर्माण व यात्रेची परंपरा सुमारे 300 वर्षापूर्वीची असल्याचे भाविक व जाणकार सांगतात. मंदिरात मागितलेले मागणे पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारी अशा दोन दिवस चार वेळेस ही यात्रा भरते व यात्रेस मुंजोबाचे ‘वार’ असे संबोधले जाते. तर या वर्षीच्या यात्रेस शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पहिल्या वारांला (यात्रेस) राज्यभसरातुन हजारों भाविकांनी येथे दर्शनाकरीता हजेरी लावली तर शेकडोच्या संख्येत भाविकांनी आप आपल्या बाल-गोपालांचे नवस फेडले. त्यात लहान मुलांचे जाऊळ काढणे, तसेच विविध तुला आणी वरण, भाजलेल्या बट्टीचे (लोडगे) नैवद्य मुंजोबांना दाखवण्यात आले. तसेच मुंजोबास दहि, भात, लोणी, यांचा देखील अनेकांनी नैवेद्य सादर केला.








