पूनखेडा येथे महिलेसह मुलीला मारहाण : सात संशयीतांविरोधात गुन्हा

Woman and girl Assaulted in Poonkheda : Case Against Seven Suspects रावेर : शिविगाळ का करता? असे विचारल्याचा राग आल्याने महिलेस मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील पूनखेडा येथे सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी सात संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जाब विचारताच मायलेकींना मारहाण
तक्रारदार लिलाबाई दिलीप रायमळे (40, पूनखेडा) या मुलगी सुवर्णा नितीन मोरे (भुसावळ) सह ओट्यावर गप्पा करीत असताना संशयीत आरोपींनी शिविगाळ केल्याने त्याचा जाब विचारला असता आरोपींनी लिलाबाई यांना मारहाण केली व हा वाद सोडवण्यासाठी सुवर्णा आल्यानंतर तिलाही मारहाण करण्यात आली व लाकडी दांडका कपाळावर मारून जखमी करण्यात आले तसेच पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर फेकून देण्यात आले. या घटनेत त्यांचे दोन ग्रॅमच्या मंगळसूत्राचे नुकसान झाले.
सात संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणी रायमळे यांच्या तक्रारीवरून मिराबाई किशोर रायमळे, कविता विश्वनाथ रायमळे, विश्वनाथ किशोर रायमळे, समाधान रमेश इंगळे, प्रमोद रमेश इंगळे, प्रतिभा प्रमोद इंगळे, अनिता समाधान इंगळे (सर्व रा.पूनखेडा) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.
