वाचन संस्कृती टिकण्यासाठी वाचनालयास जागा केली दान
न्हावीतील झोपे परीवाराचे कार्याचे सर्वत्र कौतुक
न्हावी : वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी कैमिठाराम वेडू झोपे व कै. चांगुणाबाई बुधो झोपे यांच्या स्मरणार्थ न्हावीतील मूळ रहिवासी व हल्ली चाळीसगावस्थित रेखा मिठाराम झोपे, डॉ. नरेंद्र मिठाराम झोपे व सचिन मिठाराम झोपे यांनी श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास जागा दान दिली तसेच सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कागदपत्रांचे हस्तांतरणही करून दिले. प्रसंगी मान्यवरांचा वाचनालयाकडून शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जागेचे दानपत्र वाचनालयाचे चेअरमन व संचालक मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले.
वाचन संस्कृती टिकून रहावी
दान पत्र दिल्यानंतर सत्काराला उत्तर देताना डॉ.नरेंद्र झोपे म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांमध्ये वाचन संस्कृती जिवंत राहावी आणि वाचन संस्कृत जिवंत राहण्याचे काम श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय त्यांच्या मार्फत व्हावे यासाठी ही जागा झोपे परीवाराकडून वाचनालयास दान देण्यात आली. यावेळी वाचनालयाचे चेअरमन हेमकांत गाजरे, संचालक प्रवीण वारके, नितीन चौधरी, मिलिंद बेंडाळे, गंगाराम वाघुळदे, ललित फिरके, ग्रंथपाल ललित इंगळे, उपग्रंथपाल कविता इंगळे उपस्थित होत्या. आभार वाचनालयाचे सचिव युवराज तळेले यांनी मानले.








