भुसावळातील धोकादायक इमारतींना नोटीसा : आरोग्य सुविधेसह प्रशासन सतर्क

जिल्हाधिकारी अमन मित्तल : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


Notice to dangerous buildings in Bhusawal: Administration along with health facilities alert भुसावळ : भुसावळसह परीसराला शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीकांमध्ये भीती पसरली असतानाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परीषद घेवून नागरीकांना शांतता राखण्यासह कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मित्तल म्हणाले की, आजच्या भूकंपाची रीस्टर स्केलवर 3.3 इतकी नोंद नाशिकच्या मेरी संस्थेने केली आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून आरोग्य विभागासह अग्निशमन दलालाही तैनात राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्याने शहरातील तसेच परीसरातील धोकेदायक इमारतींना प्रशासनाकडून तातडीने नोटीसा बजावण्यात येत असून इमारती खाली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरासह तालुक्यात बसले हादरे
प्रशासनाच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे, साकरी, खडके, किन्ही, शिंदी, कंडारी, फेकरी, निंभोरा, सतारे, कुर्‍हे, गोजोरे, वराडसीम, कन्हाळे बु.॥ तसेच भुसावळ शहरातील समता नगर, मरीमाता पूल, सुरभी नगर, पोफेसर कॉलनी, संतोषी माता हॉल परीसर, प्रल्हाद नगर, गांधी नगर, मामाजी टॉकीज, तुकाराम नगर, माऊली नगर, तापी नगर, हनुमान नगर, एकनाथ नगर, मार्केट परीसर, ग्रीन पार्क भागात भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले.







वाहतूक व्यवस्था सुरळीत
जिल्हाधिकारी म्हणाले, शहरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 3.3 रीस्टर स्केल असून त्यामुळे जिवीत वा वित्तहानी झाल्याचे कुठलेही वृत्त आतापर्यंत प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. रेल्वे वा बस वाहतुकीवदेखील त्यामुळे परीणाम झालेला नाही. नागरीकांनी सोशल मिडीयावरील कुठल्याही अफवांना बळी पडू नये तसेच या काळात लिप्टचा वापर प्रकर्षाने टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

यंत्रणांना सजग राहण्याचे आदेश
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ नगरपालिका स्तरावर आरोग्य तसेच अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली असून एनडीआरफच्या टीमलाही सूचना देण्यात आल्याचे मित्तल म्हणाले. प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही शाळांना बंद करण्याचे आम्ही आदेश दिलेले नाहीत मात्र मुख्याध्यापक त्या-त्या भागातील स्थिती पाहून निर्णय घेवू शकतात, असेही त्यांनी सांगत भूवैज्ञानिकांशी चर्चा करून पुढील आदेश काढू व त्यात सर्व सूचना असतील, असेही ते म्हणाले.

सोशल मिडीयावरील बातम्यांची खातरजमा करण्याचे आवाहन
नागरीकांनी सोशल मिडीयावरील बातम्यांची आधी खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी नागरीकांना केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली असून द्वारे नागरीकांना काही शंका असल्यास माहिती विचारता येईल, असेही ते म्हणाले. भूवैज्ञानिकांशी प्रशासन संवाद साधून असून त्यांच्या माहितीनंतर पुढे आणखी काही धोका आहे वा नाही याबाबची माहिती कळणार असल्याचे ते म्हणाले.

आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना
भुसावळ तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात निवासी नायब तहसीलदार शोभा घुले (02582-222592) व नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके (02582-222660) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरीकांनी काही सहाय्य हवे असल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी कळवले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !