मध्य रेल्वे जीएम संजीव मित्तल यांनी खंडवासह बर्‍हाणपूर रेल्वे स्थानकाची केली पाहणी


खंडव्यात टीटी व लोकोपायलट लॉबीचे उद्घाटन : सायंकाळी भुसावळात पत्रकार परीषद व खासदार, आमदारांशी चर्चा

भुसावळ : मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवारी भुसावळ दौर्‍यावर दाखल झाले असून पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर आगमन झाल्यानंतर भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर डीआरएम स्पेशल ट्रेन खंडव्याकडे रवाना झाली. खंडवा रेल्वे स्थानकावरील टीटी लॉबीसह लोकोपायलट लॉबीचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांनी नवीन पुलाचे निरीक्षण केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे उद्घाटन केले तसेच राजभाषा व सुरक्षा व अन्य विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर जीएम दुपारी बर्‍हाणपूरकडे मार्गस्थ झाले. बर्‍हाणपूर रेल्वे स्थानकाच्या पाहणीसह प्रवाशांशी त्यांच्याकडून संवाद साधला जात असून प्रवाशांची अडी-अडचणी ते जाणून घेत आहेत.

या अधिकार्‍यांचा सहभाग
जीएम दौर्‍यात डीआरएम विवेककुमार गुप्ता, सिनी.डीसीएम आर.के.शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच अन्य अधिकार्‍यांचा सहभाग आहे.

भुसावळात सायंकाळी लोकप्रतिनिधी संवाद व पत्रपरीषद
शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजता जीएम स्पेशल ट्रेनचे भुसावळात आगमन होणार असून यानंतर जीएम यांच्या हस्ते प्लॅटफार्म क्रमांक तीन व चारमध्ये असलेल्या छोट्या उद्यानाचे उद्घाटन होईल तर प्लॅटफार्म क्रमांक चारवरील तीक्षालयाचे निरीक्षण उद्घाटन तसेच महिला आरपीएफ कक्षाचे निरीक्षण ते करतील तसेच संपूर्ण स्थानकाची पाहणी ते करतील. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्याशी संवाद तर सायंकाळी सव्वा सहा वाजता ते भुसावळातील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील.


कॉपी करू नका.