शिक्षण संस्था टिकली पाहिजे, विद्यार्थी घडले पाहिजेत -एकनाथराव खडसे

वरणगाव : ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी घडले. ग्रामीण भागाचे खर्या अर्थाने शिक्षणामुळे राहणीमान उंचावले यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा शिक्षण संस्थांचा आहे, जुन्या शिक्षण संस्था या टिकल्या पाहिजेत व यामधून विद्यार्थी घडले पाहिजेत, असे विचार माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
शाळांनीदेखील बदल करावेत
खडसे म्हणाले की, जुन्या शैक्षणिक संस्थांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी देशाच्या सेवेत काम करीत आहेत परंतु आता एकविसाव्या शतकात पदार्पण करीत असताना शाळांनीदेखील आपल्यामध्ये बदल केले पाहिजे. डिजिटल वर्ग नद्या व शैक्षणिक साहित्य यासह अध्ययन अध्यापन सोयीस्कर होईल, या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बढे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, अध्यक्ष वंदना पाटील, उपाध्यक्ष कमलाकर चौधरी, सचिव चंद्रशेखर झोपे, सहसचिव संजय ढाके व संचालक मंडळ उपस्थित होते. विद्यालयातील 1988 च्या बॅचने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब तयार करून दिली असून त्याचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


