भुसावळ नगरपालिकेत विषय सदस्यांची निवड

भुसावळ : पालिका सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता विषय समिती सदस्यांची निवड विशेष सभेत करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन आाणि विकास, महिला व बालकल्याण तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार दीपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे मात्र अनुपस्थित राहिले. पालिकेच्या विशेष सभेत सुरवातीस भापज व अपक्ष आघाडीचे गटनेते मुन्ना तेली व जनआधारचे गटनेते उल्हास पगारे यांनी सदस्यांची नावे पीठासीन अधिकार्यांकडे दाखल केली. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन आाणि विकास, महिला व बालकल्याण तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची सर्व नावे पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार दीपक धीवरे यांनी वाचन केले. यानंतर तहसीलदारांनी नावांवरील आक्षेपाबाबत विचारणा केली. नावांवर कोणीही सदस्यांनी आक्षेप जाहिर केला नाही. महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियमानुसार या प्रत्येक विषय समितीमध्ये एक तृतीयांश पेक्षा जास्त तर एक चतुर्थांश पेक्षा कमी नसावे. असे एकूण 16 सदस्यांचा प्रत्येक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये जनआधारच्या नगरसेविका मिनाक्षी नितीन धांडे यांच्यासह सत्ताधारी भाजप गटाच्या नगरसेविका प्रतिभा वसंत पाटील, नगरसेवक रमेश नागराणी यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी करुणा डहाळे, सत्ताधारी भाजपचे गटनेते मुन्ना तेली आदी उपस्थित होते.
यांना मिळणार सभापतीपदाची संधी
पालिकेच्या विषय समितीच्या सदस्यांची निवड झाली. यात बांधकाम समिती सभापती प्रीमा गिरीष महाजन, शिक्षण समितीवर मुकेश नारायण पाटील, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर सोनल रमाकांत महाजन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर शोभा अरूण नेमाडे, नियोजन आणि विकास समितीवर सईदा बी. शेख शफी, महिला व बालकल्याण समितीवर पुजा राजू सूर्यवंशी यांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे तर स्थायी समितीवर प्रतिभा वसंत पाटील, रमेश नागराणी, जनआधारच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे यांची वर्णी लागणार आहे.


