कुर्हा हरदोतील प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न ; दोघांची प्रकृती गंभीर

बोदवड : तालुक्यातील कुर्हा हरदो येथील प्रेमीयुगुलांनी गावातील बाजार मार्केटमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास कुर्हा हरदो गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली असून अत्यवस्थ अवस्थेतील तरुण-तरुणींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोघांवर जळगावात उपचार
बोदवड तालुक्यातील कुर्हा हरदो येथील बारावीत शिकणारी 17 वर्षीय वैष्णवी शंकर गुरव आणि गावातीलच कृष्णा दगडू रोकडे (20) यांनी गुरुवारी सकाळी बाजारातील नयन तारा पार्क येथे विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी विष घेतल्याचे गल्लीतील एका नागरीकाच्या लक्षात आल्याने त्यांनी वैष्णवीच्या वडीलांना मोबाईलने संपर्क करून कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने खाजगी वाहनाने बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान दोघांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


