संशोधनामधील नवीन विकसीत ज्ञान समाजापर्यंत पोहचण्यासाठी संशोधन परीषदांची गरज


भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातील राष्ट्रीय परीषदेत जळगाव विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील यांचे विचार

भुसावळ : संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रीया असून संशोधनामधील नवीन विकसीत ज्ञान समाजापर्यंत पोहचण्यासाठी संशोधन परीषदांची गरज असून हे लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करताना महााविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्राची सांगड घालून संशोधनामधून तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी योजना निर्माण केल्या असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शुक्रवारी रसायनशास्त्र विभागातर्फ आयोजित राष्ट्रीय स्तराच्या रीसेंट ट्रेंडस अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स इन केमिकल सायन्सेस अर्थात ‘संशोधन परीषदेच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दोन सत्रात झालेल्या परीषदेत देशभरातून 128 शोधनिबंध प्राप्त झाले होते तर दिवसभरात ओरल व पोस्टर प्रकारात 70 शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले.

जीवनमान उंचावणे हेच फलित
डॉ.दिलीप रामू पाटील म्हणाले की, विद्यापीठ आणि महाविद्यालयातील उच्च शिक्षणाचा तळागाळातील माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न हेच शिक्षणाचे फलित आहे. अभ्यास अध्ययन व संशोधन आणि सामाजिक विकास याद्वारे माणसाने जीवनाच्या बॅलन्सशीटमधील टॅली पहावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वैज्ञानिक दृष्टीकोन रूजण्यासाठी परीषद
प्राचार्य आर.पी.फालक म्हणाले की, राष्ट्रीय परीषदेच्या निमित्ताने देशभरातील संशोधक व शास्त्रज्ञ यांच्यात चर्चा होवून नवीन संशोधकांना प्रेरणा तसेच संशोधनाची खोल माहिती व्हावी या उद्देशाने परीषदेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा, विकसीत व्हावा व अधिक दर्जेदार संशोधनाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी प्राचार्य फालक यांची विद्यापीठाच्या संशोधन परीषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याने दिलीप रामू पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी विद्यापीठ रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.डी.एस.दलाल, प्रा.डॉ.विकास गीते, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.ए.एम.नेमाडे, विद्यापीठ भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.एस.बी.अत्तरदे यासह देशभरातील राष्ट्रीय परिषदेत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व राजस्थान या राज्यांमधून सुमारे 128 संशोधक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील व प्रा.माधुरी पाटील तर प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे तसेच आभार प्रा.अंजली पाटील यांनी मानले. सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


कॉपी करू नका.